माणुसकी मरताना. ...........
त्या केरळमधल्या हत्तिणीला,
जिला माणसातला 'अमानवी माणूस' दिसला ..
जिनं माणसामुळे स्वतःसकट आपल्या पोटातल्या निष्पाप बाळाला गमावलं कायमचं. .
"ही घटना कळाली आणि मन सुन्न झालय गं,
माणूस माणसाशी स्वार्थी होऊन ,कसंही वागतो ,आपली पातळी त्याने ओलांडली केव्हाच. .
पण तुझा जीव गेला त्या माणसांमुळे ,एका निष्पाप, मुक प्राण्याशी असं का वागावं?
आपलं आयुष्य स्वस्त नाही हे कळतं त्या माणसाला,मग प्राणी सजीव नाहियेत का?
का कळतं नाही हे त्याला?
ही घटना एखाद्या माणसासोबत घडली असती तर?
पण अगं तू तर प्राणीच आहेस, तुला कुठे भावना?असा निर्दयपणे विचार कशावरून नसेल केला त्यांनी?
वाईट तर हे ऐकून वाटलं की,भुकेल्या जीवाची भूकही शांतता नाही करता आली त्यांना!
आणि किती विचित्र ती लोकं?
ज्यांनी किती सहज स्फोटकं भरलेलं अननस तुला - खायला दिलं, किती विश्वासघाती स्वभाव म्हणावा हा?
तु विश्वास ठेवून चुक केलीस ,असं तुला वाटत असेल ना,खर तर खूप काही विस्कटलय मनात,
तो शरीरात झालेला स्फोट !तू हादरली असशील स्फोटापेक्षा ,विश्वासघाताने!
एवढी सुशिक्षित असूनही ती माणसं, अडाणीच वाटतात मला,ज्यांनी तुला इतकी क्रूर वागणूक
दिली,ती माणसं नाहिच!उलट खरे रानटी भावनाहीन आहेत ते!
आम्ही तुम्हाला कधी जंगली म्हणायचो पण तुम्ही माणसांनाही लाज वाटेल इतके डोळस,आणि प्रामाणिक आहात.
खूप प्रश्न पडलेत मनाला ,असं वाटतं आपलंच कुणीतरी गेलय सोडून,तेही आपल्याच माणसांच्या चुकांमुळे हेच दुर्दैव!
तुझा मूक स्वभाव ,तुझ्या भावना इतक्या बोलतात कानात,
की रहावत नाही ,तुझं दु:ख समजून घ्यायचा तरीही प्रयत्न करतोय वेड्यासारखा!
नंतर वाटतं हे सगळं बघून काय वाटलं असेल तुला?
तू पाण्यात येऊन उभी राहिलीस, किती त्रासदायक असेल हे सगळं ?
मनाच्या चिंधड्या झाल्यासारखं वाटतं,जेंव्हा पोस्टमाॅर्टम नंतर कळतं की तुझ्या पोटात एक निष्पाप
पिल्लू होतं, ज्याचा जन्म होण्याआधीच त्या लोकांनी जीव घेतला होता!
आत्ता मनात त्या पिल्लाचे आवाज घूमतात,
आणि माणसांना "माझी काय चूक " असं विचारतात 😦.
बधीर झाल्यासारखं वाटतंय,.....
आत्ता कळतय ,तू वनाधिकारी ,हत्ती रस्ता दाखवत असतांनाही बाहेर का आली नाहीस ते!
कारण माणसांमधली माणूसकी मरताना तू पाहिलंस!
वाईट वाटलं की तुला वाचवू शकले नाही कोणी,
मला वाटतं तू नाहीस ह्या जगात ,हीच आम्हा बाकीच्यांना एक जोरदार चपराक आहे!
कारण माणुसकीच्या चिंधड्या इतक्या उडाल्यात की त्यात दुर्दैवाने तुझा बळी दिला गेला,
जमलं तर माफ कर गं आम्हाला, !
तू करशीलही माफ पण वाटतं, त्या माणसांची लायकीच नाही,
त्यांना त्यांची ही चूक कधी कळेल का?
अजून किती विकृत वागेल माणूस, इतकंही नको की एकाच्या वागण्याने पूर्ण मानवतेचीच
नाचक्की होईल,
एक पटलं पण,त्यांच्या जंगलीपणापेक्षा,
तुझ्यातली माणूसकी ,खरेपणा शंभर पटींनी बरा आहे आणि राहील कायम!
माफ करशील. .....?"
तुझच,
तुला ,तुझ्या निष्पाप बाळाला वाचवू न शिकलेलं
तुम्हा दोघांचाही कायम अपराधी असलेलं ,
एक संवेदनशील मानवी मन,
जे त्या अमानवी, अमानुष कृत्याचा निषेध करतं...
-कुणाल विजय ठाकरे.

Comments
Post a Comment