घर स्वप्नातल•••••••

 

जिद्दीने  उभ्या चार खंबीर भिंतींत एकोपा असावा
संयमाच्या  छप्पराने  नात्यांचा ओलावा जपावा .

सकारात्मकतेची हवा खिडकीतून ओसंडून वहावी 
संयमाची दारं रूबाबात खुली  असावी.

समाधानाच्या पलंगावर विश्वासाची उशी दिसावी
 साधेपणाच्या सोफ्यावर,प्रामाणिकपणाची नक्षी असावी. 

स्वयंपाकघरातून नावीन्याचा घमघमाट सुटावा
 स्वकष्टाच्या भाकरीत पंचपक्वानांचा भास व्हावा.

मेहनतीच्या तिजोरीत स्वाभिमानाची संप्पत्ती  खुशाल 
असावी 
भाबडी माणुसकीसुद्धा  मौल्यवान वाटावी.

भरभराटीच्या परसबागेत  प्रयत्नांची शर्थ व्हावी 
आपलेपणाच्या अंगणात आशेच्या रंगांची रांगोळी काढावी. 

एकमेकांनी चुकावं, उपदेशांचे डोस पाजावे
तरीही  आधार व्हायला एकमेकांचा पटकन पुढे व्हावे
अश्रू  एकमेकांच्या डोळ्यातले हक्काने पुसता  यावे.



आनंद कुंडीतल्या रोपट्यासारखा वाढतच जावा
प्रेमाचा गुलमोहर  नव्याने बहरावा.

हसणं आरशासारखं प्रतिबिंबित होत रहावं 
शब्दाशब्दांनी बोलणं उलगडत जावं. 

समानता इतकी सहज  वागण्यात यावी,
की सुख-दु:ख सर्वांची आपलीच वाटावी .

एकमेकांना इतकं छान स्वीकारता यावं
की  स्वत्व घडवणं  अगदी सोप्प  व्हावं.

सण मिळून साजरे करताना उत्साहच रोशणाईसारखा वाटावा 
दिखाऊपणाच्या डेकोरेशनपेक्षा,एकमेकांची सोबत हाच सोहळा वाटावा.

काहीही होऊ दे  आयुष्यात पण
आपल्या माणसांसोबत प्रत्येक क्षण भरभरून जगता
यावा
अनमोल माणसांसोबत हा आगळावेगळा घरोबा कायम जपता यावा.


                       -कुणाल  विजय ठाकरे. 

























Comments

Popular posts from this blog

नकारात्मकतेचं सीमोल्लंघन..

Little things 😍😍

जुनून ....❤❤❤